Tuesday, July 7, 2020

सातनाळ


                                 श्रीगणेशाय नम:

                                       सातनाळ

4 मार्च दुपारी तीन ला नितीनचा फोन, "दादा, या वीकेंडला सातनाळ करायची. निसणी, लिंग्या आणि देवघाट - कुर्डुगड परिसर ".   नितीननं  एखादी घाटवाट  सुचवली  की त्याच्या मागोमाग निघायचा हा आता अलिखित नियमच!

  दोन  एक  वर्षापूर्वी भूषण जोशी नी  मी  लिंगाण्याच्या , "मुळीच्या" वरच्या  पॅच वर बसून  समोरचा रायलिंग पठार परिसर न्याहाळत होतो . दूर कुठेतरी डाव्या बाजूला भूषण ने कोकण दिवा  दाखवला. म्हटलं;  जाऊ एकदा. भूषण तयार झाला पण मोहरी  वरून! एरव्ही पुण्याहून पानशेत मार्गे  कोकण दिव्याला जायला  फक्त दोन तीन  तास लागतात .  मोहरीमार्गे  हेच  अन्तर  कदाचित  एक वा  दोन  दिवस ? पण जायचंच .     
भूषण   जोशी  सोबत लिंगाणा  परिसरात 
साधारण 2018 च्या डिसेंबरमध्ये  मोहरी ते कोकण दिवा  हा योग  जुळला.सकाळी नऊ वाजता मोहरी वरून निघालेलि आमची  स्वारी साधारण तीन वाजता  खानुचा  डिग्गा  परिसरात पोहोचलि. गाडी मागे मोहरी गावातच  लावलेली होती. खानू  वरून समोर दिसणारा कोकण दिवा बघून वाटत नव्हतं की उद्या परत मोहरीला पोहोचू. निर्णय झाला; रायगड  पायथ्याच्या वारंगीला मुक्कामी पोहोचायचं, बोचे घळ मार्गे. तिथं मुक्काम आणि  सिंगापूर घाटाने  विना पासपोर्ट सिंगापूर- मोहरी.  याच मुक्कामी वारंगीच्या मंगेश वारंगे कुटुंबाशी अनपेक्षित स्नेह् जोडला गेला


आतापर्यंत बोराटा, नळीची वाट , सोडून केलेल्या या पहिल्या नाळा वा  घाटवाटा  !
सह्याद्रीत क्लाइंबिंग सोडून  भुरळ घालणार पहिल्यांदा काहीतरी गवसल होतं.  आतापर्यंत ट्रेकिंग हे फक्त किल्ले  किंवा रेंज ट्रेक, तेही किल्ल्यांच्या अनुषंगाने करतात एवढच मला  माहिती होतं.यातले काही ट्रेक केलेही पण  ज्या ओढीने क्लाइंबिंगला  सह्याद्रीत गेलो  ती ओढ  ह्या किल्ल्यांची कधीच नाही लागली.

दरम्यान लिंगाणा  परिसरातल्या, फडताळ आणि भिकनाळेतला एक आकस्मिक अविस्मरनिय मुक्काम. लोणावळया जवळच्या रंगीत  गर्दीत अक्षरशः हरवलेल्या  कुरवंडे, आंबेनळी , करवंदी, पायमोडी वाटांची तंगडतोड . रायगड  परिघातलली रुळलेली निसणीच्या वाटेची गुडूप अंधारात चाचपडत केलेली उतराई.  जवळजवळ लुप्त झालेल्या गायनाळेची चढाई.या साऱ्या भटकंतीने घाट वाटांची ही ओढ  अजूनच घट्ट झाली. क्लाइंबिंग बरोबरच सह्याद्रीत अज्ञातात घुसायच अजून एक दालन सापडलं !                                       

नितीनचा या घाटांचा व्यासंग खरच कौतुकास्पद . गावाकडच्या एखाद्या गुरुजींना जशी आपल्या वर्गातली 40 एक पोर त्यांच्या गल्ली,आळी व नावासकट माहित असतात अगदी तशीच याला सह्याद्रीतल्या   प्रत्येक भागातल्या घाटाची  जंत्री पाठ!  कदाचित त्यालाही आता माझ्या या घाटवाटा प्रेमाचा सुगावा लागलेला आहे त्यामुळे नेहमी हा पट्ट्ठ्या काहीतरी नवनवीन सुचवतच असतो आणि नशीबानं  तिथं जायचे योग जुळतायेतही.

कुर्डूगड:-

पुणे मार्गे ताम्हिणी  घाटा खाली नवीनच  झालेला प्रशस्त एमआयडीसी रोड सोडल्यानंतर साधारण पाच किलोमीटरवर  डाव्या बाजूला जिते गावी जाणार  फाटा  आहे . कुर्डूगड चे हे पायथा गाव.  पुढे आहे उंबर्डे. तामिनी ते जिते रस्ता सुखद.  मागच्याच पावसाळ्यात दापोली प्रवास ताम्हिणी घाटातून  केला होता. त्या आठवणी पुढे आताचा रस्ता स्वर्गीय !   

उंबर्डे :-


 कोकण  सापटीतलं  एक छोटसं  गाव. गावालगतच असलेल्या जीर्ण महादेव मंदिराजवळ भाऊ होगडे यांच्या प्रशस्त घराजवळ  गाडी थांबली. घरापासून  साधारण पन्नास एक फुटावर काळ नदी पात्रालगत महादेव मंदिर आहे. एकेकाळी हेमाडपंती बांधकाम असावे पण आता शिल्लक राहिला आहे तो केवळ कळसाचा सापळा.मंदिराच्या  परिसरात  विखुरलेले अवशेष व  बऱ्याच वीरगळी , सती शिळा  नीट मांडून ठेवल्या आहेत . तेवढचं  एक समाधान. मंदिर प्रवेशद्वारा वरचा  लंबोदर , गाभाऱ्यातील प्रशस्त, सुबक  शिवलिंग लक्षवेधी..  प्रत्येक वीरगळ हि त्या वीराचे वीरमरण दर्शवणारे  चित्रमय पट्टी-. कोकणातल्या एखाद्या छोट्या मंदिर परिसरात एवढ्या संख्येने वीरगळ नि सती शिळा पाहायची हि पहिलीच  वेळ . गावातही  काही छोटी समाधी वजा  मंदिरं  व  वीरगळी दिसल्या. हा सर्व ठेवा किती दिवस जतन होईल हा एक आणि बर्‍याच वेळा मनात आलेला प्रश्न

सात नाळ:-

सातनाळ परिसर फोटो: नितीन मोरे सुतार 
 वाटाडे दत्ता आणि  बबन  जोरकर हे थेट कुर्डूवाडी वरून येणार होते त्यामुळे हाताशी बराच वेळ होता. मामांची  वाट बघता बघता नितीनने  समोर मांडलेला घाटांचा पट उलगडून दाखवला. उंबर्डे शिव मंदिरासमोरच उजव्या बाजूला कुर्डूगडाचा सुळका, कुर्डू गडाच्या समोरच नव्याने झालेल्या टॉवर  लाइन खालून घाटावरचे धामणहोळ गाव जवळ करणारे निसणी ची वाट , तिच्या डावीकडे लिंग्या घाट , लिंगाच्या डावीकडे दुर्गाडी डोंगर आणि त्याच दुर्गाडीच्या खाली चौऱ्या पठार.  ह्या पाठरावरच घाटावरून उतरतात ,आता पूर्ण मोडलेली देवघाट नि साधारण वापरातील लिंग्या  घाट वाट. चौऱ्या पठार हा या दोन्ही घाट वाटांचा मधला टप्पा. इथं पाण्याची काही खोदीव टाकी आहेत

सुरुवात सात नाळेने करू आणि त्या बाजूनेच देव घाटाचा मधला टप्पा चौर्या च्या डोंगरावर येऊ , तिथुंन  सुरु होणारी  देव घाटाची  खालची  बाजू पकडून  कुर्डुगड पायथ्याच्या कोळी राज्याच्या  वाड्याच्या अवशेषांजवळ बाहेर पडू हा साधारण प्लान.

सातनाळ परिसर फोटो: नितीन मोरे सुतार 
मंदिरा  समोर उभं राहिल्यास, हा सर्व खेळ, उजव्या बाजूला ठेवून वर घाटावर धामणहोळ गावी  विठ्ठल मंदिरा शेजारी , सात खळग्यात उगम पाऊन,  सात महाकाय नाळांच्या वाटेनं कोकणात उतरणारी काळ नदी. ह्या सर्व नाळा  एकत्र मिळून काळ नदीचा प्रवाह उंबर्डे जवळ कोकण सपाटीत येतो .याच प्रवाहाचं कोकणात उतरणार  टोक ,जिथं ताशीव कड्या मुळे पुढं जण शक्य नाही तिथपर्यंत आम्हाला पोहचायचे होतं.ह्याला स्थानिक "पाळणा" म्हणतात.

सुरुवात -

 साधारण दहाच्या आसपास दोन मामां सोबत नदीच्या पात्रातून रपेट  सुरुवात केली, एखादाचं किलोमीटरच पुढे गेल्यावर  साधारण  दीड एक गुंठ्यात पसरलेल्या मोठ्ठया  उंबराच्या सावलीत पहिल कलिंगड बाहेर पडल. कारण जागेला योग्य न्याय ! ह्या जागे समोरच पुढल्या कड्यात मामांनी काही गुहा दाखवल्या. कोळी राजाने आपला खजिना इथं लपवला व खाली येताना पायऱ्या तोडल्या. त्यामुळं आता कुणीही तिथे जाऊ नाही शकत इति मामा.

इथं साधारण उजव्या बाजूला  मामांनी चौऱ्यावर जाणारी घळ दाखवली. इथून तासभर चालल्यावर प्रवाहाच्या  टोकाला  असणारी पाण्याची कुंड नि  "पाळणा"  बघून परत याच ठिकाणाहून चोऱ्यावर जायच ठरलं

 एव्हाना आम्ही नाळेच्या बरेच आत आलो होतो आणि या संख्येने  सातच असणारा याची खात्री पटली.या टप्प्यावर नाळेचे पूर्ण रूपच पालटले होते.संपूर्ण वाट हि पत्रातल्या मोठया दगड गोट्या मुळे  अतिशय संथपणे मागे पडत होती .

नितीन नि  YMS  (पूर्ण  नाव  ;-  यल्लालिंग  महादेव  शेजाळे !) सोडून बाकी सर्वांना  मी  पहिल्यांदाच भेटत होतो. किल्ले, मंदिरांचा माहितगार देवा  घाणेकर, ह्या सह्याद्रीत मुरलेला केदार पाटील, अतिशय अबोल निलेश  वाघ  , घाटवाटांची ओढ असणारी अजून एक मैत्रीण योगिता  गोडांबे ताई नी टोळीतलं  शेंडेफळ गरिमा गुप्ता , यांचा सुरवातीला  मी अबोल आहे हा समज आतापर्यंत पूर्णपणे  गैरसमजात परिवर्तित झाला होता 😀😀.

आजूबाजूची हिरवाई चांगलीच जाणवत होती. या परिसरात लोकांचा वावर कमीच असणार नाहीतर  झाडांची हि एवढी गर्दी दिसली नसती.सगळ्यांची  कुठे एखाद्या मोठया बोल्डर वरून वाट काढायची तर मध्येच अडकलेल्या  मोठाल्या ओंडक्यावरून पुढं सरकायची कसरत चालू होती.

नाळ एका टप्प्यावर बंद होते  त्याच्या  अलीकडे साधारण 200 फूट नाळ सोडून डाव्या  बाजूला जंगलात घुसावे लागलं   .ही छोटीशी वाट मात्र  नवख्यांची परीक्षा बघणारी, पण तशी रोप न बंधताही करता येते.

पाळणा -

 शेवटच्या टप्यातली साधारण 50 एक फुटाची नाळेच्या डाव्या बाजूची घसरडी वाट नाळेच्या बंद टोकावर घेऊन येते.  बसायला भरपूर सपाटी, बाजूला थंडगार झरा पण थोडी वर  बाल्कनीत असणारी कुंड मात्र पूर्णपणे कोरडी होती. मार्च  च्या उकाड्यातत कुंडांमध्ये डुंबायचं स्वप्न मात्र  अपूर्णच राहिलं.  घाल बंद करणारी समोरची  90 औंशातलली भिंत वर कुठेतरी दुर्गाडी डोंगराच्या पायथ्यात  घाटावर संपत असावी.

बंद नाळेकडे तोंड करून उभे राहिल्यास, उजव्या भिंतीत साधारण तळच्या कुंडपासून 30 एक फुटा वर, वरून कोसळणाऱ्या  प्रवाहाने  एक मोठे नेसर्गिक कुंड तयार केले आहे. स्थानिक यालाच " पाळणा" म्हणतात. मार्च चा पहिला आठवडा असल्यामुळे कदाचित  पाणी गायब.  शिल्लक होता फक्त वरून संथ झिरपणारा ओलावा. खरंतर लांबून पाहिल्यावर हि संथ झिरपणारी ओल एखाद्या दोरीसारखी दिसत होती.  त्या नॆसर्गिक चौकोनी टाक्यावर ; त्यामुळेच  तर पाळणा म्हणत नसतील कदाचित?  इतर सदस्यांची परवानगी घेऊन थोडा वर  सरसावलो पाळणा जवळून पाहण्यासाठी. पाण्याची खोली फारतर दोन एक  फूट असेल नि  कुंडाचा आकार साधारण १५*१०  . पण यात माशांची हजारो पिलावळ पाहून मती गुंग झाली. डोकं टेकवून खाली आलो तर YMS ने मुद्दाम नितीन च्या वाढ दिवसासानिमित्त  आणलेला छोटा फ्रुट केक तयार होता. प्रवाहातील मातीनेच ब डे बॉय चा टिळा झाला नि मेणबत्ती ची ओवाळणी!

वरचा पाळणा -

फक्त सांधण हीच जीव ओवाळून टाकावा अशी  एकमेव दरी सह्याद्रीत आता पर्यंत पहिली होती. तीच अनुभूती आज इथंही  अनुभवली.प्रचंड शांतता . आदिम नि शुद्ध ठिकाणं  ; कदाचित मानवी वावर नसेलच.  पाळण्याच्या वर भिंतीतून पाझरणाऱ्या अखंड धारेच्याही  वर  कड्यात  देवीचे ठाण असल्याच मामानी सांगितल. पण  वर जाणारी वाट अतिशय बिकट . मामांना सुतक असल्यामुळे दोघेही  बरोबर येणार नव्हते. पण मंडळ मामा शिवाय स्वारी  ला तयार !

डाव्या कड्यातून तिरकी जाणारी  वाट मामानी दाखवली.. वाटेला चांगलाच ड्रॉप आहे.  एक भिडू  साधारण चाळीस फूट वर जाऊन वाटेचा अंदाज घेऊन आला. तांत्रिक साधनांशिवाय वरच्या पाळण्यात जाणे धोकादायक असल्याची  सर्वांनाच खात्री झाली आणि अर्थातच सुरक्षिततेला   सर्वोच्च प्राधान्य देऊन पुन्हा कधीतरी परतायचा बेत कडून मंडळ खालच्या बाजूला मार्गस्थ.
एव्हाना दोन वाजले  होते, पाळण्याच्या खालच्या सपाटीत  पोटोबा नि कलिंगड क्रमांक दोन संपवता संपवता  पावणेतीन वाजले.
आता वेध लागले ते चौऱ्या वर जायचे,   मामानी सकाळी  चौऱ्या वर जायला दाखवलेली घळ जवळ करता करता चार वाजले . समोर पसरलेला अथांग सह्याद्री एकाच दिवसात पाहून संपवायचं बंधन नाही , तेव्हा सर्वानुमते विशेषता ग्रुप मधले शेंडेफळ गरिमाच्या सांगण्यावरून चौरे कॅन्सल ! पुढचा टप्पा कोळी राजा वाडा अवशेष. खरतर ह्या क्षणी  योगिता ताई थोडी नाराज होती, चोऱ्या नि देव घाटाचा खालचा टप्पा मिस होणार म्हणून , पण गारीमाचा निर्णय तिनेही मान्य केला, देवा कडून परत यायचं प्रॉमिस घेतल्यावरच !

खरंतर मला नंतर कळालं  कि हा  ट्रेक प्लॅन  प्रिती पटेलच्या  सातनाळ भटकंती च्या आधाराने बनवला होता . परंतु आमच्या वाटाडे मामांना प्रीतीनं  नमूद केलॆली " मंडप " हि जागा माहिती नसावी . त्याच्या ऐवजी आम्ही पोहचलो पाळण्याला! प्रिती आणि टीमने या भागात केलेल्या  भटकंतीला सलाम !  उंबर्डे  गावातून योग्य वाटाड्या घेऊन जाणे कधीही उत्तम.


कोळी राजा वाडा -

 पाळणा सोडल्यानंतर, साधारण  तासाभरात आम्ही कोळी राजा वाड्याच्या अवशेषांजवळ  आलो . मामानि   माहिती दिल्या प्रमाणे हे अवशेष साधारण  दोन चार एकरात  पसरलेले आहेत. एके काळी  लिंगी नि देवघाट वरून उतरणाऱ्या गर्दीची ह्या वस्ती(?) वरून कल्पना  येते. मोठी जोती, पाण्याची खोदीव टाकी, ओढ्या वर पाणी अडवायला  टाकलेले बांध, भव्य तटबंदी इ बरंच काही

या कोळीराजा बद्द्ल मामा कडून फारस काही कळलं नाही.  पण या जागेत गावकर्यांचा वावर मात्र नक्की नसणार, कारण मामानी सांगितलेले एक दोन किस्से. एकंदरीतचं  हे प्रकरण गुढ!!!

एकेकाळच्या  ऐश्वर्य नि सामर्थ्यावर आज  जंगल राज्य करतंय .

कोळीवाडा अवशेष पाहताना मनातली उदासी काही जात नाही. काय झाला असेल तेव्हा एवढ्या मोठ्या  लोकसंख्येचे ?  मी: का बर संपल असेल हे सार ?  केदार-  बरीच कारणे असू शकतील , वाटांचा वावर पूर्ण बंद,  इंग्रजी आमदानीतल नुकसान  किंवा  "साथीचे रोग" 

केदार  च शेवटचं वाक्य आजही कानात  घुमतं . आजची परिस्थिती बघता खरंच या काळात  सुद्धा एखादा साथीचा रोग आपला  एवढा भव्य दिव्य व्याप संपू शकतो !!! तर  त्या काळाची कल्पनाच न केलेली बरी. केदारशी  गप्पा  मारताना  तो माझ्या आवडत्या गुरु थत्तें  मॅडमचा शेजारी हे कळले .  फार पूर्वी  माझ्या पडत्या काळात एकदा मॅम  ची भेट घेतली  होती, अगदी निघताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. गोस्ट आता पूर्ण आठवत नाही  पण  त्यांचं ते शेवटचं वाक्य नेहमी लक्षात राहिलं :- "  “This Too Shall Pass !”

परत -

साधारण साडेसहाला मंडळ उबर्डेतल्या भाऊ होगडे  यांच्या घराजवळ आल. घराबाहेरच  प्रशस्त खळं पाहून जर तिथे मुक्कामाची ईच्छा झाली नाहीतर केदार नि निलेश  च्या भाषेत तुम्ही ट्रेकर म्हणून   "टोटल  फेल" !!! भाऊंच्या घरच  आदरातिथ्य  कुठलीही शहरी माणसाला  लाजवणारे.

आज दिवसभरात नेमकं काय पाहिल? कुठलीही पॉईंट A टू B नि B टू  C  असं  ठरवून अंतर  पार  पाडलं नव्हत ,  पण अतिशय वेगळ्या आणि कदाचित  कुठल्याही ट्रेकिंग मॅपवर नसलेल्या एका जागेवर जाण्याचे भाग्य  नि समाधान मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच होतं.हाडाच्या भटक्याला या पेक्षा वेगळं काय हवं?

 :- उंबर्डे शिव मंदिर परिसर -:









    :- सतनाळेची  सुरवात -:






       :- नाळेचा शेवटचा टप्पा-: 



   :- पाळणा -:


       :- पाळणा परिसर -:





    :- कोळीराजा  वाडा -:





   :- अतिशय उत्त्साही वाटाडे  श्री  बबन जोरकर मामा (कुर्डूपेठ)-:


सहभागी डोंगर वेडे

नितीन मोरे सुतार 
YMS  (यल्लालिंग  महादेव  शेजाळे !) 
देवा  घाणेकर
केदार पाटील 
निलेश  वाघ 
योगिता  गोडांबे  
गरिमा गुप्ता 
श्रेणी ;- सोपी , मात्र  वरचा पाळणा तांत्रिक साधनांची मदत घेऊनच करावा!

वेळ  :- उंबर्डे  गावापासून  साधारण  ३ तास.

पाणी  :-   मार्च  च्या पाहिल्या  आठवड्यात पाळणा परिसरात पाणी होते.  पण  गावापासून  मध्ये कुठेच पाणी नाही मिळालं .

धन्यवाद!

सचिन मदने
madanesachin78@gmail.com
+91 9881880301